देऊळगाव राजा : श्री बालाजी महाराज संस्थानच्यावतीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला ड्रिंकिंग वाॅटर सिस्टीम व मल्टिपॅरामीटर मॉनिटर्स देण्यात आले.
श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजाचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी दिनांक ११ मे रोजी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली होती. या भेटीदरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आस्मा शाहिन यांनी कोविड रुग्णांसाठी ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम व मल्टिपॅरामीटर मॉनिटर्सची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी राजे यांनी या वस्तू ग्रामीण रुग्णालयास भेट स्वरूपात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिनांक १५ जून, २०२१ रोजी ड्रिंकिंग वॉटर सिस्टिम यामध्ये वाॅटर फिल्टर, वाॅटर कुलर तसेच ड्रिंकिंग वाॅटर सिस्टिमसाठी शेडसुद्धा उभारून देण्यात आले. त्याचबरोबर दोन मल्टिपॅरामीटर मॉनिटर्स अशा १ लाख ५७ हजार २३१ रुपयांच्या वस्तू भेट देण्यात आल्या़. श्री बालाजी महाराज संस्थानने वरील वस्तू वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आस्मा यांच्या देखरेखीखाली रुग्णालयास सुपूर्द केल्या. यावेळी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, संस्थानचे व्यवस्थापक कि. दा. बीडकर, तहसीलदार डाॅ. सारिका भगत, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आस्मा शाहिन तसेच शहरातील सर्व पत्रकार उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डाॅ. अनंत आवटी, डाॅ. किरण मोगरकर, प्रा. मधुकर जाधव, मंगेश जगदाळे आदींनी परिश्रम घेतले.