१२० पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात १२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ४ मे रोजी आढळून आले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
लस न घेताच लाभार्थी परत
बुलडाणा : जिल्ह्यात लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. परंतु अनेक केंद्रावर लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना नोंदणी करूनही वेळेवर लस मिळत नाही. त्यामुळे लस न घेताच लसीकरण केंद्रातून अनेक लाभार्थी परत जात आहेत.
सर्व बँक कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करावे
किनगाव राजा : अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी बँक कर्मचाऱ्यांमधून करण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका व पतसंस्था नागरिकांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत आहे.
अज्ञात व्यक्तीकडून वृक्षाची तोड सुरूच
डोणगाव : परिसरातील रोडलगत अज्ञात व्यक्तीकडून वृक्षांची तोड केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनसंपदा धोक्यात येत आहे. आरेगाव, जवळा, गोहोगाव, शेलगाव रस्त्यावर असणारे झाडे तोडून त्यांना आग लावून वृक्ष जाळण्याचे प्रकारही या भागात सुरूच आहेत.
कोरोनाने रक्ताचे नाते ही दुरावली
दुसरबीड : कोरोनाच्या वाढत्या मृत्यू दरामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मृत रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकही समोर येत नाहीत. परंतु, कोरोनाचा धसका घेतल्याने रक्ताचे नातेवाईक देखील मृतदेहाजवळ लवकर येत नाही.
विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई
मेहकर : कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध मंगळवारी कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असून नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी, असेही आवाहन नगर पालिकेकडून करण्यात आले आहे.
नदी स्वच्छतेचा प्रश्न
बुलडाणा : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जलस्त्रोत तळ गाठतात. त्यामुळे नदीतील गाळ काढणे, नदीची स्वच्छता करणे आदी कामे केली जातात. परंतु सध्या नदी स्वच्छतेच्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
बीबी: येथील काही वॉर्डात रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गंजलेले खांब पावसाळ्यापूर्वी बदलण्याची आवश्यकता आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
लसीकरण केंद्राच्या ठिकाणी दिव्यांगांना अडचणी
बुलडाणा : शहरातील दिव्यांगांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होऊन ते कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहतील यासाठी शहरातील कोविड लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. परंतु शहरातील दिव्यांग नागरिकांना नोंदणी करून लसीकरण करण्यास अडचण येत आहेत. अनेक दिव्यांग केंद्रापर्यंत पोहचू शकत नाहीत.
जि. प. शाळांमध्ये विलगीकरण केंद्र
बुलडाणा : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, त्याचप्रमाणे घरांमधील अपुऱ्या खोल्या व सुविधांचा अभाव यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होऊ नये यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून अनेक जिल्हा परिषद शाळेत सर्व सुविधायुक्त विलगीकरण केंद्र तयार करण्यात येत आहे.