- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सातपुडा पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास व्यवसायाला चालना मिळणार आहे. असे झाल्यास जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याची मागास म्हणून असलेली ओळखही पुसली जाईल. याबरोबरच युवकांसह स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागत असली तरी ती फायदेशीरच ठरते. पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये निवास आणि अन्य सुविधांची वानवा दिसते. सातपुडा पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास येथे अनेक सुविधा व विविध व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होतील. या व्यवसायातून अनेकांना रोजगारही मिळू शकतो. प्रवासाची सुविधाही पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास मदत होते. शिवाय ट्रॅव्हल कंपन्यांचे कार्यालय मोठ्या शहरात असले तरी पर्यटन क्षेत्रात असे एजंट काम करू शकतात. यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते. एखादा एजंट बऱ्याच कंपन्यांसाठी काम करू शकतो. त्यामुळे त्याला जास्त पैसे मिळू शकतात. या कंपन्यांच्या कार्यालयामध्येही विविध कामे करता येतात. यामध्ये बुकिंग क्लार्कचा समावेश आहे. पर्यटकांच्या निवासासाठी व जेवणासाठी हॉटेल व्यवसायही महत्त्वाची भूमिका बजावतो. यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने बेरोजगारीची समस्या कायमची मिटण्यास मदत होईल, यात शंका नाही.त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पर्यटन स्थळ विकसित झाल्यास व्यवसायाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:43 PM