- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात धरण, तलावांची भेगाळली धरणी माता दुष्काळाची दाहकता खुणावत आहे. गावोगावी पाणी प्रश्न पेटला असून, अनेकांच्या हाताला कामी नाही. त्यामुळे विकतच्या पाण्यासाठीही घरात पैसे उपलब्ध होत नाहीत. असे विदारक चित्र अनेक गावांमध्ये सध्या पाहावयास मिळत आहे. तर मेहकर, लोणार तालुक्यातील काही गावातील ८० ते ९० टक्के लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झाले आहेत. दुष्काळाच्या दाहकतेत सर्वसामान्य होरपळून निघत असताना मजुरांच्या हातालाही काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात जिल्ह्यातील मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर वाढले आहे. जिल्ह्यातील काही गावांच्या नशिबी कायम आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक मागासलेपण पाचवीला पुजले आहे. घरी अत्यल्प एक ते दोन एकर शेती, त्यात निसर्गाची अवकृपा. यामुळे शेतीतील उत्पादनासाठी खर्चच अधिक होत असल्याने तोट्यात जाणाºया शेतीला कंटाळून अनेकांनी मजुरी सुरू केली; परंतु मजुरीसाठी गावातच नव्हे, तर परिसरातही कुठे काम मिळत नसल्याचे भयावह जिल्ह्यातील काही गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील गोत्रा, नांद्रा, रायगाव, मढी, पहुर, दाभा, खुरामपूर, टिटवी व इतर गावातील आदिवासी कुटुंब बाहेरगावी जाऊन काम करीत आहे. लोणार तालुक्यातील टिटवी या गावी मजुरांना हाताला काम नसल्याने परजिल्ह्यात मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. जवळपास टिटवी येथील ८० ते ८५ टक्के लोक रोजागाराच्या शोधात बाहेरगावी गेलेले आहेत. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेशिवाय कुठलीच कामे होत नाहीत; परंतु रोहयोच्या कामावरही मजुरांऐवजी जेसीबीचा वापर होत आहे. त्यामुळे स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळेल, अशी कुठलीच उपाययोजना शासनाकडून केली जात नाही. त्यात आता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरण, तलावांनी तळ गाठल्याचे दिसून येते आहे. पाणी पुरवठा निवारणार्थ उपाययोजनांसाठी जिल्ह्यात टँकरची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १९९ गावांतील लाखो नागरिकांची तहान सुमारे २०६ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील २३ गावांसाठी २४ टँकर, चिखली तालुक्यातील १४ गावांसाठी १५ टँकर, देऊळगाव राजा तालुक्यातील २७ गावात २८ टँकर, लोणार तालुक्यातील आठ गावात ११ टँकर, मेहकर तालुक्यात १४, मोताळा १८, मलकापूर ५, नांदुरा १९, शेगाव २२, खामगाव २९, संग्रापूर एक अशा प्रकरे एकूण २०६ टँकर सुरू करण्यात आले आहेत.
लोणार शहराला होणारा पाणीपुरवठा काळेपाणी गायखेड व इतर ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा कमी होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना व सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये खासगी टँकरद्वारे पाण्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. - हाजी मोहम्मद रिजवान, लोणार.