नीलेश जोशी / खामगाव: सलग दोन वर्षांंपासून अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या विविध महसुली करापासून मिळणार्या उत्पन्नालाही फटका बसण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे यावर्षी जिल्ह्याचे महसुली उत्पन्न वाढविण्यावर वरिष्ठ पातळीवर भर देण्यात आल्याने गतवर्षीच्या तुलनेत जवळपास २२ टक्क्यांनी अधिकचे उद्दिष्ट महसूल प्रशासनास मिळाले आहे. परिणामी यंत्रणेची हे विविध महसुली कर वसूल करण्याची तारेवरची कसर होत असल्याचे चित्र आहे. आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास अवघा दीड महिना बाकी आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर जिल्ह्यातील महसुली उत्पन्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी आढावा ही घेतला आहे. त्यामुळे सध्या महसुली यंत्रणा कर वसुलीचे उद्दिष्टपूर्तीसाठी सक्रिय झाली आहे. गतवर्षी अवर्षणाची स्थिती असतानाही महसूल प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल साडेतीन टक्के अधिक उत्पन्न महसुली करापोटी मिळविले होते. ५६ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षात मिळाले होते. त्यामुळे यावर्षी विविध करातून सुमारे ७५ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळविण्यासाठी महसुली यंत्रणेला आता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांपेक्षा हे उद्दिष्ट अधिक आहे. जवळपास १९ कोटी रुपयांनी हे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. मात्र यावर्षी अवर्षणाची स्थिती बिकट आहे. जिल्ह्याची अंतिम पैसेवारीही ३७ पैसे आली आहे. १४२0 गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शे तकर्यांसाठी सुमारे सहा लाख रुपयांचा सामान्य जमीन महसूलही राज्य शासनाने माफ केला आहे. त्याचाही परिणाम जिल्ह्याच्या महसुली उत्पन्नावर पडणार आहे.
दुष्काळाचा महसुली उत्पन्नास फटका!
By admin | Published: February 15, 2016 2:29 AM