लोणार/सिंदखेडराजा (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे जिल्हाभरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रातील सचिवस्तरीय अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पथकाने १५ डिसेंबर रोजी लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द आणि माळसावरगाव येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थिती आणि पीकपाण्याचा आढावा घेतला.अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या आवर्षणसदृश परिस्थितीची पाहणी करताना या पथकाने अंजनी खुर्द येथील आनंदा काळुसे या शेतकर्याच्या शेतीची पाहणी केली. यावेळी खरीप हंगामात शेतीत काय पीक घेतले व पिकाचे उत्पादन घटण्याचे कारण काय, याची विचारणा केली असता काळुसे यांनी आपल्या चार एकर शेतात तुरीच्या ओळीत सोयाबीनचे पीक घेतल्याचे सांगितले. गतवर्षी चार एकर शेतीत ४0 क्विंटल सोयाबीनचे पीक घेतले होते; मात्र यावर्षी सोयाबीनचे उत्पादन ७0 टक्क्याने घटले. त्यामुळे यावर्षी ४ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्याने पेरणीचा खर्चही वसूल न झाल्याची व्यथा शेतकरी काळुसे यांनी या पथकासमोर मांडली. अंजनी खुर्द येथील उमाशंकर काटकर या शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्यांच्या घरी हे पथक दाखल झाले.केंद्रातील सचिवस्तरीय अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सुधीरकुमार, चंद्रशेखर साहुकार, सिंग, बादल या पाच जणांचे पथक तालुक्यातील अंजनी खुर्द येथे १५ डिसेंबर रोजी ४ वाजता दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रालयातील मदत उपसचिव मंदार पोहरे, अपर सचिव श्रीरंग घोलपसह जिल्हाधिकारी चिंतामण जोशी, उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार निलेश अपार, नायब तहसीलदार मदन जाधव, सहायक गटविकास अधिकारी बाबूसिंग चव्हाण, रवींद्र मापारी, तालुका कृषी अधिकारी विवेक गायकवाड, बोरकर आदी अधिकार्यांची उपस्थिती होती.
केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
By admin | Published: December 15, 2014 11:49 PM