बुलडाणा: जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह उर्वरित पाच तालुक्यातील २१ मंडळामध्ये राज्यशासनाने दुष्काळ जाहीर केला असून त्यातंर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी तीन व १२ नोव्हेंबररोजी पत्रक काढून संबंधीत भागात दुष्काळी सवलती लागू करण्याचे निर्देश दिले असून या सवलतींची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाध्ये मलकापूर, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपुर, लोणार, सिंदखेड राजा या सात तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून मोताळा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ शासनाने घोषित केला आहे. सोबतच सहा नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील साखळी व म्हसला, चिखली तालुक्यातील एकलारा, कोलारा, धोडप, पेठ, शेलगांव अटोळ, चांधई, देऊळगांव राजा तालुक्यातील देऊळगांव राजा, तुळजापुर, मेहुणा राजा, अंढेरा, मेहकर तालुक्यातील जानेफळ, शेलगांव देशमुख, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी गवळी, नायगांव दत्तापुर, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगांव काळे, वडशिंगी व आसलगाव या २१ महसूल मंडळात दुष्काळ घोषित केला होता. या सर्व दुष्काळी भागात २१ आॅक्टोबर व सहा नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने विविध प्रकारच्या आठ सवलती लागू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी आता आदेश निर्गमीत केले आहेत. या भागात दुष्काळी सवलती देण्यास राज्य शासाने मंजुरी दिल्याने हे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. या सवलतीमध्ये जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पूनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुल्कात माफी, रोहयोच्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर झालेल गावात शेतकर्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा बाबींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केले.
बुलडाणा जिल्ह्यातील आठ तालुके व २१ मंडळात दुष्काळी सवलती लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 3:51 PM