खामगाव, दि. ९- अवैध दारू विक्री व निर्मितीला पायबंद घालण्यासाठी गृहविभागाने अधिक कडक पावले उचलली असून, या उपाययोजनेमध्ये ग्रामरक्षक दलाला सहभागी करून घ्यावे, त्याबरोबरच वारंवार असा व्यवसाय कारणार्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली आहे. तसे निर्देश पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. अवैध दारू धंद्यावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आता नवी चतु:सूत्री आखून दिली असून, या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. अवैध दारूची विक्री व निर्मिती करणार्या व्यक्तीस अटक करून त्याच्याविरुद्ध तीनपेक्षा अधिक वेळेस कारवाई झाली असेल, तर त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय अवैध दारू निर्मिती, विक्रीसंदर्भात माहिती मिळताच त्वरित कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत, यामध्ये अवैध दारू निर्मिती, विक्रीमध्ये गुंतलेल्यांचा बरोबरच ज्याप्रकरणी अशा अवैध दारूची निर्मिती होत आहे, अशा जागेच्या मालकाचा सक्रिय सहभाग आहे, असे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्धदेखील गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना पोलिसांना आहेत. ज्या ठिकाणी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले आहेत, अशा ठिकाणच्या ग्रामरक्षक दलाचे दोन सदस्य साक्षीदार म्हणून घ्यावेत, तसेच ती अवैध दारू कोठून व कोणत्या मार्गाने आणली, याबाबत संबंधित तपास अधिकार्यांनी तातडीने शोध घ्यावा. दारू पिऊन शांतता भंग करणारे व गुन्हेगारी कृत्य करणार्या सराईतांविरुद्ध दारूबंदी अधिनियमाच्या कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घ्यावे, तर सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संयुक्त पथके कार्यान्वित अवैध दारू धंद्यावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रितपणे कार्यवाही करण्यासाठी बैठका घ्याव्यात, तसेच दोन्ही विभागांनी स्वतंत्रपणे केलेल्या कार्यवाहीची माहिती एकमेकांना द्यावी व अशा कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त यांनी आयुक्तालय स्तरावर आणि पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा स्तरावर संयुक्त पथके स्थापन करावयाची आहेत.
दारू विक्रेत्यावर आता हद्दपारीची कारवाई!
By admin | Published: March 10, 2017 1:42 AM