बुलढाणा: अजिंठा मार्गावरील बुधनेश्वर पाट्या समोर मढच्या जंगलात २२ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास एका अज्ञात ट्रकद्वारे धोकादायक केमीकलचे १० ते १२ ड्रम फेकण्यात आले आहेत. त्यातील ३ ते चार ड्रम फुटून त्यातील केमिकलची गळती होऊन गॅस बाहेर निघत आहे. हा गॅस हवेत मिसळल्यामुळे परिसरातील छोटी-मोठी झुडपे करपून गेली आहेत.
दरम्यान या प्रकरामुळे परिसरातील दोन ते तीन किमीच्या परिसरात हवेत दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जळजळ होत आहे. काहींना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. दरम्यान या प्रकारामुळे मानवी आरोग्यसह वन्य श्वापदांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच धाडचे ठाणेदार नरेंद्र पेंदोरे घटनास्थली दाखल झाले. त्यांनी बुलढाणा येथून पालिकेच्या अग्निश्यामक पथकास पाचार केले.
दरम्यान ज्या भागात हा प्रकार घडला आहे तो भाग बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव खान्देश या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. प्रकरणाचे गांभिर्य पहाता वनविभागाचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ड्रमवर असलेल्या लेबल वरून टेट्रा क्लोरो इथिलीन नावाचे हे केमिकल असल्याच सांगण्यात येत आहे. ते मानवी आरोग्यस धोकादायक असल्याचेही बोलल्या जात आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फरदापूर पोलिस ठाण्यालाही माहिती देण्यात आली आहे. हे केमिकल कोणी आणि का टाकले? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.