लोणार : कृषी विभागाकडून कोरडवाहू शेती अभियानांतर्गत विविध योजनांच्या समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करून निवडलेल्या गावांमध्ये तीन वर्षे कोरडवाहू तंत्रज्ञानाची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करताना लाभार्थी शेतकर्यांना गरजेनुसार शेती उपयुक्त साहित्य ५0 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येते. सुरुवातीला दोन वर्षे योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर चालू वर्षात निधीअभावी कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कृषी विभागाने शेतकर्यांच्या मागणीनुसार शेती साहित्याचे प्रस्ताव मागविल्यानंतर निधीअभावी सदर प्रस्ताव कृषी कार्यालयात धूळ खात आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३ गावांची तीन वर्षांसाठी निवड झाली असून, सन २0१५-१६ या वर्षासाठी ५ कोटी ३७ लाख ३१ हजार रुपये एवढय़ा निधीची मागणी कृषी विभागाने शासनाकडे केली आहे. देशातील एकूण पेरणीलायक क्षेत्राच्या जवळपास ४५ टक्के क्षेत्रच सिंचनाखाली असून, राज्यात हे प्रमाण जेमतेम १८ टक्के एवढेच आहे. पूर्ण सिंचन क्षमता विकसित केल्यानंतरही राज्यातील जवळपास ७0 टक्के क्षेत्र कोरडवाहू राहत असल्याकारणाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करून जनतेचे जीवनमान उंचविण्याकरिता कृषी विभागाने सन २0१३-१४ पासून कोरडवाहू शेतीचा विकास अग्रक्रमाने करण्याकरिता कोरडवाहू शेती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली.
कोरडवाहू शेती अभियानाला निधीची ‘कोरड’!
By admin | Published: December 09, 2015 2:46 AM