डोणगाव : डोणगाव हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील गाव असून येथे झालेल्या एकाच पावसाने राज्य महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने मुख्य रस्त्यावर पाणी साचत आहे. तर आजुबाजुला नाली, शेजारी असणाऱ्या दुकानात पाणी घुसले आहे. डोणगाव येथे बसस्थानकाशेजारी पुलाजवळ ग्रामपंचायतने स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधलेले आहेत. पण गत काही दिवसापासून याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाल्याने हे स्वच्छतागृह केवळ शोभेचे बनले आहे. परिसरात अतिक्रमण वाढले असून येथेच परिसरातील लोक घाण कचरा टाकत असल्याने पुलाचे पाणी जाण्याची नळीच बंद झाली आहे. तर राज्य महामार्गालगत असणाऱ्या दुकानांनी नाली बंद केल्याने राज्य महामार्गावर पाणी येत असून आरेगाव रोडवर असणाºया घरांमध्ये पाणी जात आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून स्वच्छतागृहाजवळील नळी व राज्य महामार्गालगतच्या नाल्या मोकळ्या करुन स्वच्छ कराव्या, अन्यथा पावसाळ्यात राज्यमहामार्गावर पाण्याचे डबके साचून मोठमोठे खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतचे सफाई अभियान नागपूर-मुंबई या राज्यमहामार्गावर येणाºया डोणगाव येथे पाणी साचल्याचे समजताच ग्रामपंचायतचे सरपंच जुबेरखान यांनी त्वरीत जेसीबी बोलावून पुलाखालील घाण साफ करुन पाणी वळते केले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्या मोकळ्या करणे आवश्यक आहे.(वार्ताहर)