शेगाव(जि. बुलडाणा), दि. १२: शेगाव विकास आराखडा अंतर्गत श्री संत गजानन महाराज मंदिराला लागूनच असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीला आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत तयार करण्यात आलेल्या विविध पध्दतीच्या सदनिकांचे लॉटरी पध्दतीच्या वितरण कार्यक्रमात शुक्रवारी संतप्त रहिवाशांनी गोंधळ घालत मुख्याधिकार्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर ४६ सदनिकांचे वितरण करण्यात आले.२0१0 साली शेगाव विकास आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर शहरातील श्री गजानन महाराज संस्थानला लागून असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीमधील कुटुंबीयांना आळसणा रोडवरील म्हाडाच्या जागेत तयार करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये स्थलांतरीत करण्याची योजना शासनाकडून आखण्यात आली होती. या अंतर्गत अंतिम टप्प्यात आलेले या सदनिकेचे काम पाहता शुक्रवारी नगर पालिकेमध्ये सदनिकांचे लॉटरी पध्दतीने वितरणाचा कार्यक्रम तहसीलदार गणेश पवार व मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मात्र सदर सदनिका ह्या निकृष्ट दर्जाच्या तयार करण्यात आल्या असून त्यांची जागा आणि बांधकाम खुपच कमी असल्याने या सदनिका वितरीत करण्यात येवू नये, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. असे असताना नगर पालिकेने शुकऋवारी सदनिका वितरणाचा कार्यक्रम घेतल्याने मातंगपुरी परिसरातील संतप्त महिलांसह नागरिकांनी नगर पालिकेच्या सभागृहात गोंधळ घालून मुख्याधिकारी अतुल पंत यांना शिव्यांची लाखोली वाहिली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहता न.प. प्रशासनाकडून लगेच पोलीसांना पाचारण करण्यात आले. यावेळी ठाणेदार यशवंत बावीस्कर यांच्यासह दंगाकाबू पथकाने सभागृहात पोहचून गोंधळ घालणार्या नागरिकांना नगर पालिकेच्या बाहेर काढले. यानंतर पोलीस देखरेखीखाली एकेकांना सभागृहात पाठविण्यात आले.
गोंधळामुळे सदनिकांचे बंदोबस्तात वाटप
By admin | Published: August 13, 2016 1:08 AM