लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव सोहळा गेल्या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी गणरायाच्या मूर्तिकामात हात आखडता घेतला आहे. मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्ती बनवूनही मागणी न आल्यास, माल तसाच पडून राहण्याची भीती मूर्तिकारांसह व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे.कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना, पुन्हा डेल्टा प्लस नावाच्या नव्या विषाणूने डोके वर काढले असून, त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर दुसऱ्या वर्षीही काही बंधने लादली जाणार काय व मोठ्या गणेशमूर्ती बनवाव्यात की नाही, अशी संभ्रमावस्था मूर्तिकारांमध्ये बघायला मिळत आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे. कारागिरांमध्ये गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
मूर्तिकारांना आर्थिक फटका
दोन वर्षांपासून कोरोनाचे विघ्न असल्याने तयार केलेल्या गणपतीच्या मूर्तींना अल्प प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी नसल्याने मोठ्या मूर्ती बनविल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
या वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्या कारणाने मोठ्या मूर्ती बनवाव्यात की नाही, अशी संभ्रमावस्था मूर्तिकारांमध्ये निर्माण झाली आहे.