बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकामुळे जिल्ह्यात संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत गत काही दिवसांपासून पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
---
जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी
बुलडाणा : शहरातील विविध वस्त्यांमध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करावी, अशी मागणी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचेही निवेदनात म्हटले आहे.
---
अन्यथा शिक्षकांचे वेतन होणार स्थगित
बुलडाणा: टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांचे वेतन स्थगित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे कोरोना संकट काळातच टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
-----
खिळेमुक्त अभियान राबविण्याची मागणी
बुलडाणा : बुलडाणा-खामगाव, बुलडाणा-मोताळा, बुलडाणा-चिखली, बुलडाणा-औरंगाबाद रस्त्यांवरील झाडे वाचविण्यासाठी खिळेमुक्त अभियान राबविण्याची मागणी हरित सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
----
सेंद्रिय शेती मार्गदर्शन कार्यशाळा
बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीवर आधारित उद्योगासंदर्भात ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना नैसर्गिक गूळनिर्मितीबाबत शेतीतज्ज्ञ विकास सावरकर यांनी मार्गदर्शन केले.
------------
४५ वर्षांखालील नागरिकांना लस द्या!
मोताळा : कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ४५ वर्षांखालील सामान्य नागरिकांचे लसीकरण करा, अशी मागणी विनोद सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-----------
‘उज्ज्वला’ लाभार्थी त्रस्त
बुलडाणा : धूरमुक्त स्वयंपाक घर या संकल्पनेला गॅस दरवाढीमुळे फटका बसत आहे. गत काही दिवसांपासून गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
---
गारपिटीचे दुबार सर्वेक्षण करा
बुलडाणा: गारपीटग्रस्तांसाठी दिला जाणारा निधी मुख्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गारपिटीचे दुबार सर्वेक्षण करण्याची मागणी शेषराव तुकाराम भालेराव (रा. डिडोळा) यांनी केली आहे. मोताळा तालुक्यातील गारपीटग्रस्तांचा निधी रखडला आहे.
----------
विनापरवाना रेती वाहतूक जोरात
मेहकर : तालुक्यात गत काही दिवसांपासून विनापरवाना रेती वाहतूक जोरात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
--
रस्त्यालगतची झाडे पेटवली
मोताळा : तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील झाडे अज्ञात इसमाने पेटवून दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे समजते.
-------
रात्रीच्या संचारबंदीत वाढ करा!
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत आहे. यामध्ये बुलडाणा येथे रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे बुलडाणा शहरात रात्रीच्या संचारबंदीत वाढ करावी, अशी मागणी रेखा तिडके यांनी केली आहे.
---
निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण
अमडापूर : परिसरातील स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण त्वरित थांबवावे, अशी मागणी विनोद कसबे यांनी केली आहे.
----------
रेमडेसिवीरच्या मागणीत वाढ
बुलडाणा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वाढीस लागत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५७६३ बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे गत काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे.
----------