लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : मलकापुर वासियांची तहान भागविण्यासाठी नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापतींच्या प्रयत्नांना यश आले असून शहराचा पाणीपुरवठा लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पुर्णा नदी पात्रात खोल खड्डा खोदण्यात आला असून त्यात जमा झालेल्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.मलकापूर शहराला धुपेश्वर येथून पुर्णानदीवरुन पाणीपुरवठा केला जातो. मात्र पुणार्माय आटली असल्याने तसेच नदीपात्रात साचलेला गाळ ओला असल्याने पोकलेन, जे.सी.बी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे शहरवासीयांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला.दरम्यान नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र वाडेकर, नगरसेवक राजु पाटील, अनिल गांधी, पाणीपुरवठा अभियंता आचार्य, अयुबभाईसह न.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गत महिनाभरापासून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असुन पोकलेनद्वारे नदीपात्रात १० बाय ३० आकाराचा २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यामुळे या खड्डयात पाणी आले असून २० हॉर्सपॉवरच्या मोटारीने पाणी उपसा करण्यात येत आहे.यामुळे पंधरा दिवसांवर गेलेला मलकापूर शहराचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती राजेंद्र वाडेकर व कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
खोलीकरणामुळे पुर्णा नदीपात्रात वाढला जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:24 PM