ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 17 - व-हाडातील वनसंपदा असलेल्या विस्तीर्ण अशा ज्ञानगंगा अभयारण्यात शेतक-यांनी वृक्षतोड करून शेती करण्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे जंगलाचा -हास होत आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांचा निवा-याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील २०५ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध औषधी वनस्पतींसह बिबट, अस्वल, हरिण, नीलगायींचे वास्तव्य आहे. या अभयारण्यातील काही गावांचे पुनर्वसन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र काही अडचणींमुळे गावांचे पुनर्वसन रखडले आहे.
या गावांमधील नागरिक गावालगतच शेती करतात. मात्र, दिवसेंदिवस त्यांच्या शेतीचा परिसर वाढतच आहे. रात्रीच्या सुमारास काही वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. सदर वृक्षतोड केल्यानंतर त्या ठिकाणी पिकांची पेरणी करण्यात येते. हा प्रकार गत काही वर्षांपासून वाढीस लागला आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने हा प्रकार अधिकच वाढीस लागला आहे. जंगलांमध्ये शेतक-यांचा वावर वाढल्याने वन्य प्राण्यांवरही याचा विपरित परिणाम होत आहे.
अवैध लाकूड व्यावसियाकांचाही हात?
शेतालगच्या वृक्षांची तोड करून लाकडे बुलडाणा किंवा अन्य शहरातील अवैध लाकडांचा व्यवसाय करणा-यांना विकण्यात येतात. त्यामुळे या व्यावसायिकांकडून शेतक-यांना वृक्षतोडीसाठी फूस लावण्यात येत आहे. वृक्षतोड करून व शेतीचा परिसर वाढवून शेतक-यांना फायदा होत असला तरी या व्यावसायिकांचेही चांगलेच फावत आहे.
वन विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल
ज्ञानगंगा अभयारण्यात अनेक वर्षांपासून ही गावे आहेत. या गावांमधील शेतकरी त्यांची शेती करतात. मात्र, या ठिकाणी वृक्षतोड करून शेतीचा परिसर वाढविण्यात यत असेल तर निश्चितच वनविभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल. - बी. ए. पोळ, एससीएफ, वनविभाग, बुलडाणा