लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकर्यांचा जीवाभावाचा सोबती वृषभ राजाचा सण पोळा तोंडावर आल्याने साजशंृगाराच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे; परंतु यंदा जीएसटीमुळे पोळ्यावर महागाईचे सावट असून, त्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडली आहे. त्यामुळे शे तकर्यांमध्ये निराशेचे वातावरण दिसून येत आहे.शेतकर्यांच्या सोबत शेतामध्ये वर्षभर राबराब राबणार्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी शेतकरी बांधवांकडून पोळा हा सण साजरा केला जातो. यावेळी बैलांना न्हावू घालून साजशंृगार केला जातो. याकरिता आवश्यक साहि त्याची रेलचेल दुकानांमध्ये दिसून येत आहे; परंतु यावर्षी बैलांचे हे साजशृंगाराचे साहित्य जीएसटीमुळे महागले आहे. त्यातच पावसाने दीर्घकाळापासून दडी मारलेली असून, पिके धोक्यात आलेली आहेत. संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आहे. अशावेळी बैलांच्या साजशृंगाराचे साहित्यसुद्धा महागल्याने शेतकर्यांचा उत्साह मावळला असून, त्यांच्यात निराशेचे वातावरण दिसून येते. परिणामी, यंदाच्या पोळ्यावर महागाईचे सावट असल्याने वृषभ राजाचा हा सण जेम तेमच साजरा होणार असल्याचे दिसून येत आहे.
साजशंृगारासाठी हे साहित्य लागते पोळ्याच्या दिवशी आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी शेतकरी विविध साहित्याची खरेदी करतात. यामध्ये कवड्या, घुंगरमाळा, नवी वेसन, नवा कासरा, पायातील चांदीचे करदोडे, घुंगरु, शिंगांना बेगड, बाशिंग, अंगावरील झुल असे विविध साहित्य लागत असते; परंतु यंदा हे साहित्य काहिसे महागले आहे.