लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : साखरखेर्डा येथून परिसरातील खेड्यापाड्यात जाणाऱ्या बसच्या वेळापत्रकात मेहकर आगार प्रमुखाने बदल केल्याने शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या बसेस पूर्ववत सुरु कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. साखरखेर्डा या गावची लोकसंख्या २० हजारांच्या जवळपास असून, येथे स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय एसईएस हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल, जिजामाता विद्यालय या शिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांना जाण्या-येण्याकरिता एसटी बसही एकमेव सेवा कार्यरत आहे. सकाळी मेहकर येथून सुटणाऱ्या बसच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. त्याचबरोबर साखरखेर्डा येथून ७.४५ नंतर १०.३० पर्यंत मेहकर येथे जाण्यासाठी बस नसल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी साखरखेर्डा येथून ९.३० वाजता मेहकरसाठी नियमित बस सुरू करावी. त्यानंतर ११ ते १.३० या मधल्या वेळात एक बस सुरू करावी, अशी मागणी आगारप्रमुखाकडे प्रवाशांनी केली आहे. मेहकर ते देऊळगाव राजा मार्गे लव्हाळा, साखरखेर्डा, शेंदूर्जन, मलकापूर पांग्रा ही अनियमित बस येत असून, सिंदखेडराजा येथे शासकीय कामानिमित्त आणि कर्मचाऱ्यांना कामानिमित्त ही बस सोयीची आणि एकमेव असताना ती आठवड्यातून दोन वा तीन दिवसच धावते. तीच परिस्थिती साखरखेर्डा ते जालना या बसची आहे. १ वाजता साखरखेर्डा येथून निघणारी ही बस कधी-कधी येतच नाही. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे साखरखेर्डा येथून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी मेहकर आगाराच्या ह्या दोन बसेस असताना त्या जर आल्या नाहीत, तर ६० किमीचा प्रवास हा जीवघेणा होतो. याबाबत मेहकर आगारप्रमुख पाथरकर यांना वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांचे दुर्लक्ष होत आहे. बंद केलेल्या आणि वेळापत्रकात बदल केलेल्या बसेस नियमित सुरू न केल्यास प्रवासी रास्ता रोको करतील, असा इशारा सरपंच महेंद्र पाटील, भागवत मंडळकर, गंभीरराव खरात, मनोहर तुपकर, अनिल तुपकर, अशोक खरात यांनी दिला आहे.
अनियमित बसफेऱ्यांमुळे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 12:19 AM