लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाच्या काळात गाेरगरीब उपाशी राहू नये, यासाठी १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थाली देण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे. जिल्ह्यातील दाेन हजार गरजूंना याचा लाभ हाेणार आहे.
वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.तसेच अत्यावश्यक सेवाव्यतिरीक्त इतर सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. या काळात गरीब लाेक उपाशी राहू नये यासाठी शासनाने अल्पदरात शिवभाेजन सुरू केले हाेते. तसेच १५ एप्रिलपासून शिवभाेजन थाळी माेफत देण्याची घाेषणा शासनाने केली आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रांवरून दरराेज दाेन हजार थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे, गरजूंना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीपासून काेराेना संक्रमण वाढत असल्याने लाॅकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. याचा सर्वाधिक फटका गाेरगरिबांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पॅकेजची घाेषणा केली आहे.
शिवभाेजनमुळे आधार मिळाला
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. शिवभाेजनामुळे आधार मिळाला आहे. आधी अल्पदरात आणि आता माेफत शिवभाेजन थाली देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा हा निर्णय चांगला आहे. निर्बंधाच्या काळात दिलासा मिळाला.
अजय जतकर, बुलडाणा
शासनाने कडक निर्बंधाच्या काळात शिवभाेजन थाळी माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने, हाॅटेल बंद असल्याने सर्वसामान्यांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे.
राजू झिने, बुलडाणा
शहरातील सर्व हाॅटेल्स बंद असल्याने बाहेरगावातून येणाऱ्यांसाठी शिवभाेजन आधार ठरत आहे. बसस्थानकावरच माेफत मिळत असल्याने गरजू प्रवाशांना शिवभाेजनचा आधार मिळत आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य आहे.
भगवान शर्मा, बुलडाणा
१५० ते २०० थाळी
जिल्ह्यात १७ केंद्रांच्या माध्यमातून १५ एप्रिलपासून माेफत शिवभाेजन थालीचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी दरराेज रांगा लागत आहे.
एका केंद्रावर दरराेज १५० ते २०० थाळ्या वितरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शहर व जिल्ह्याची लाेकसंख्या पाहता दरराेज वितरित हाेणाऱ्या थाळ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.