लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील गोंधनखेड येथील मराठी प्राथमिक शाळेच्या खोलीची भिंत २ ऑगस्ट रात्री साडेअकराच्या सुमारास पावसामुळे कोसळली. सुदैवाने ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळाखोल्या जीर्ण होवून मोडकळील आल्या असताना याकडे प्रशासनाने अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांंच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेने ऐरणीवर आला आहे.चिखली पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील गोंधनखेड येथे असलेल्या जि.प.मराठी प्राथमिक शाळेच्या एक वर्गखोलीची उत्तरेकडील भिंत काल झालेल्या पावसामुळे रात्री साडेअकराच्या सुमारास कोसळली. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुख्याध्यापक बी.एम.राठोड व आर.एस.जाधव यांना याबाबत कळविले. दरम्यान सकाळी ८ वाजता या शाळा खोलीची प्रविण पाटील, रामचंद्र गवई, अर्जून गवई, रंगनाथ शेगोकार, संदीप गवई, आर.आर.पाटील, ग्रामसेवक खरात, विश्वनाथ गवई यांनी पाहणी करून याबाबत जि.प.व प.स.प्रशासनास माहिती दिली. या घटनेत शाळेतील १ टेबल, २ खुच्र्या, १ कपाट, ७ डेस्क-बेंच, २ पेट्या, ३१0 पुस्तके आदींचे नुकसान झाले आहे. तसेच या शाळेतील इतर खोल्यांच्या भिंतींनाही मोठ-मोठे तडे गेले असून ते केंव्हाही कोसळू शकतात. सुदैवाने ही घटना शाळा सुरू नसताना रात्रीच्यावेळी घडल्याने शाळेतील विद्यार्थ्यांंच्या जिवित्वास कोणतीही बाधा पोहचली नाही व मोठा अनर्थ टळला आहे.
सर्वच शाळा खोल्यांची तपासणी करातालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारती जीर्ण व मोडकळीस आलेल्या असल्याने विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने धोकादायक ठरल्या आहेत. ही बाब गंभीर असतानाही याकडे प्रशासनाचे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे. गोंधणखेड येथील घटना दिवसा शाळा सुरू असताना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता, यापासून बोध घेत प्रशासनाने तातडीने सर्व शाळांच्या इमारतींची अवस्था तपासावी व आवश्यक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी पालकांकडून होत आहे.
व्हरांड्यात भरते शाळागोंधणखेड येथील शाळा खोलीची भिंत कोसळल्याने तसेच इतर खोल्यांच्या भिंतींनाही तडे गेले असल्याने शाळेची संपूर्ण इमारात धोकादायक ठरली आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांंना बसविणो जिकरीचे ठरणार, ही बाब पाहता विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीची खोली देण्यात यावी, अशी मागणी सरपंच रूपाली हागोणे पाटील यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी रामटेके यांच्याकडे केली होती. मात्र, या खोल्यांमध्ये पोषण आहाराचे धान्य असल्याने ही खोली उपलब्ध होवू शकली नाही. परीणामी ऐन पावसाळय़ात विद्यार्थ्यांंना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे.