धामणगाव व परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध जमिनीतील ओलीवर खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या होत्या. यावर्षीही काही शेतकऱ्यांना सोयाबीन न उगवल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या. सध्या रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे खरिपातील सोयाबीन बहरात आले आहे. रिमझिम पावसामुळे सोयाबीनच्या पिकात तणाची वाढही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तण काढण्यासाठी काही शेतकरी तणनाशकाची फवारणी करीत आहेत, तर काही बैलांच्या साह्याने कोळपणी करीत आहेत. लाॅकडाऊनच्या काळात हाताला कसलेच काम नव्हते. परंतु, आता महिला मजुरांना खुरपणीचे काम मिळाले आहे.
मजुरांना दिलासा...
यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रिमझिम पाऊस पडत असल्याने आंतरमशागतीला वेग आला आहे. शेतमजुरांनाही सध्या शेतात काम मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कपाशीत निंदणी करताना महिला मजूर दिसून येत आहेत.