ओमप्रकाश देवकर
मेहकर : कोरोना विषाणूचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. काेरोनाची साखळी ताेडण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्रीही बंद असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज, खरबूज पडून असल्याचे चित्र आहे तसेच काही शेतकऱ्यांना आपल्या शेतातील ठेमसे उकिरड्यावर फेकून द्यावी लागली.
काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. तसेच भाजीपाला विक्री व फळ विक्रीही बंद असल्याने शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज, खरबुजासह भाजीपाल्याच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र या पिकाच्या खरेदीसाठी ग्राहक व व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अनेक शेतकरी आपला माल शेतातच फेकून देत असल्याचे चित्र मेहकर तालुक्यात आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कायम आहे. याचा विपरीत परिणाम जनसामान्यांना जाणवत आहे. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या खरबूज, टरबूज पिकाला भाव मिळत नसून व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या वेळेस व्यापारी आले तरी खूपच कमी भावाने टरबुजाची मागणी करीत आहेत. जानेवारी महिन्यात लागवडीच्यावेळी कोरोना प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र फळ तोडणीच्या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाला गतवर्षीप्रमाणे कडक निर्बंध लावावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. तालुक्यातील टरबूज व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी भेटत नसल्याने लागवडीसाठी केलेला खर्च काढण्यासाठी या शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर बसून विक्री करावी लागत आहे. रस्त्यावर दुकाने लावल्यानंतर माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने टरबूज व भाजीपाला खराब होत आहे.
पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ
आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबुजाची लागवड केली होती. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर तसेच दर्जेदार बियाणाची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे पिकाची जोपासना केली. यासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून, व्यापारी येत असून तेही कमी भावाने मागणी करत आहेत. खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने सर्वच विक्री करताना मोठी अडचण निर्माण झाल्याने लावलेले भांडवली निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे या शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षापासून काेराेनाचा फटका बसत असल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे शेतामध्ये टरबूज, ढेमसे व इतर भाजीपाला पिकाची लागवड केली होती. मात्र प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लावल्याने मालविक्री करण्याकरिता अडचण निर्माण होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. दत्तात्रय इंगळे, शेतकरी, प्रिंप्री माळी