मेहकर : लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे येथे बैलपोळा भरविण्यात आला नाही. मात्र मेहकर शहरात आजही ट्रॅक्टर पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून, येथे ट्रॅक्टर पोळ्याची परंपरा जपली जात आहे.
बैलांची संख्या घटली असून, त्याठिकाणी ट्रॅक्टर आले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे आता बैलाऐवजी ट्रॅक्टर दिसून येत आहेत. ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याची शहराची परंपरा आहे. पूर्वीपेक्षा बैलांची संख्या ग्रामीण भागात कमी झालेली असून सधन शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतील पेरणी, डवरणी, वखरणी, नांगरटी आदी कामे करून घेतात. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही, त्या शेतकऱ्यांच्या शेतातील कामे ट्रॅक्टरमालक भाड्याने करून देतात. त्यामुळे बैलांची कामे ट्रॅक्टर करत असल्याने ट्रॅक्टरचे महत्व वाढले आहे. शहरातील व ग्रामीण भागातील ट्रॅक्टर मालकांनी आज आपले सजवलेले ट्रॅक्टर एकत्र आणले. जानेफळ चौकात शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या हस्ते या वाहनांची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टर पोळा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. रहाटे चौकात दरवर्षी भरणारा पोळा यावर्षी भरविण्यात आला नाही.
असा निघाला ट्रॅक्टर पोळामेहकर शहरातील जिजाऊ चौक, पोलीस स्टेशन, आंबेडकर वाटिका, धर्मवीर रहाटे चौक मार्गे ट्रॅक्टर पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली. हा ट्रॅक्टर पोळा पैनगंगा नदीवर गेला. या मिरवणुकीत प्रा.आशिष रहाटे, शिवसेनेचे तालुका प्रमुख निंबाजी पांडव, ॲड.आकाश घोडे आदी सहभागी झाले होते.