- योगेश फरपटखामगाव : शेगाव तालुक्यातील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना मात्र पाणीटंचाई कधी दूर ही चिंता सतावत आहे. घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये पावसाळा लागला तरी पाण्यासाठी भटकंती कायम आहे.बहुतांश गावातील जलपातळी घटली आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणे कठीण आहे. शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथील बोअरवेल व विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. गावात टँकर कधी येईल, याची नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेले असतात. गावात टँकर आले की, महिला, पुरुष, मुले, मुली टँकरवर पाणी भरण्यासाठी तुटून पडताना दिसतात. यावर्षी सुद्धा दोन टँकर येथे सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना न केल्याने नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावत असल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या गावची लोकसंख्या ५००० आहे. गावातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील वर्षात तरी येथील पाणीप्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यातही पाण्यासाठी 'झुंज', बुलडाण्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाई कायम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:37 PM