चिखली(जि. बुलडाणा), दि. २३: सततच्या पोटदुखीमुळे त्रस्त झालेल्या चिखली येथील रुग्णाची किडनी बदनापूर येथील डॉक्टराने शस्त्रक्रियेदरम्यान काढून घेतली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसात तक्रार देताच डॉक्टरने या प्रकारची कबुलीही दिली आहे. चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील ५२ वर्षीय अशोक लिंबाजी डोंगरदिवे यांना नेहमी पोटदुखीचा त्रास होत होता. वैद्यकीय निदानात मुतखडा असल्याचे स्पष्ट झाले होते. मुतखड्याचा आकार मोठा असल्याने त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे जालना जिल्हय़ातील बदनापूर येथे मोफत उपचार केले जात असल्याची माहिती मिळाल्याने डोंगरदिवे यांनी २ जुलै रोजी बदनापूर येथील नूर हॉस्पीटलमध्ये गेले. तेथील डॉ.एम.डी.गायकवाड यांनी शस्त्रक्रिया केली. मात्र, मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी त्यांची किडनीच काढून घेतली. ही बाब डोंगरदिवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुअण्णा पडघान व अन्य ग्रामस्थांना सोबत घेऊन डॉक्टरांना जाब विचारला. मात्र, डॉक्टरांनी अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक डोंगरदिवे यांनी बदनापूर पोलीसांत धाव घेत संबंधीत डॉक्टराविरूध्द रितसर तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरने दिली कबुली किडनी गायब असल्याची बाब समजल्यानंतर डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रूग्ण, ग्रामस्थ व नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यासह अरेरावी करणार्या डॉ.गायकवाड याने पोलिसांत तक्रार दाखल होताच चूक कबूल करून शस्त्रक्रियेदरम्यान दरम्यान किडनीला कात्री लागून रक्तस्त्राव झाला. त्यामुळे किडनी निकामी झाल्याने ती काढावी लागली, असे सांगून नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले आहे, अशी माहिती पिडीत रूग्ण डोंगरदिवे यांनी दिली आहे.
मुतखड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान किडनीच केली गायब
By admin | Published: August 23, 2016 11:57 PM