संदीप वानखडे, पिंपळगाव सराई : देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेत २४ मार्च रोजी दुपारी दोन वाजता लाखो नारळांची हाेळी पेटणार आहे़ सैलानी यात्रेसाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत.
सैलानी बाबांच्या यात्रेसाठी परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, तेलंगणा ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, बीड, लातूर, कळमनुरी आदी भागांतून लाखोच्या संख्येने होळीसाठी भाविक येतात़ होळी संपली की तीस मार्च रोजी पिंपळगाव सराई येथून उंटांनी वरून रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सैलानी बाबाचा मुजावर यांच्या पिंपळगाव सराई येथील घरातून सैलानी बाबाचा संदल काढला जातो़ सैलानी यात्रा परिसरामध्ये भाविक झोपड्या बांधून राहतात़ सैलानी यात्रेतील होळीमध्ये भाविकांनी अंगातील कपडे व जिवंत कोंबडे होळीमध्ये टाकू नये असे आवाहन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ़ किरण पाटील यांनी भाविकांना केले आहे़ होळीत खराब कपडे टाकल्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होते.
यात्रेसाठी राहणार चोख बंदोबस्त-
सैलानी बाबाच्या होळीसाठी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, बुलढाणा पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सैलानी यात्रेतील होळी बंदोबस्तासाठी चाेख बंदाेबस्त लावला आहे़ यामध्ये पोलिस निरीक्षक तीन, एपी आय २५, पीएसआय २५, पुरुष कर्मचारी ४५०, महिला कर्मचारी १५०, होमगार्ड २८० असा ९०० पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त सैलानी यात्रेतील होळीसाठी लावण्यात आला आहे़