‘माझी शेती, माझा सात-बारा, माझा पीक पेरा’ या घोषवाक्याच्याआधारे शासनाने सुरू केलेल्या प्रकल्पाअंतर्गत पीक पाहणी करण्याची सुरुवात १५ ऑगस्टला झाली होती. आजपर्यंत देऊळगावराजा तालुक्यातील एकूण ३१ हजार ४२६ गटांपैकी फक्त ७ हजार ४६८ शेतकऱ्यांनीच ई पिकांमध्ये नोंदणी केली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, तर काही ठिकाणी अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ॲपची नोंदणी करावी यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
नेटवर्कचा खोळंबा
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपच्या वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अँड्रॉईड मोबाईलमधील पुरेसे ज्ञान नसल्यामुळे तसेच प्रसंगी बहुतांशी ग्रामीण भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे आणि वेळेवर फोटो अपलोड होत नसल्यामुळे ई पीक पाहणी नोंदणीत अडचणी निर्माण होत आहेत.
माझे सहा गट असून, तीन गटांची ई - पीक पाहणी भरण्यासाठी मला आठ दिवस लागले. तीन दिवस जवळपास सर्वर डाऊन होते. दोन दिवस फोटो अपलोड झाले नाहीत आणि रेंज नसल्यामुळे आम्हाला पीकपाणी भरण्यासाठी खूप अडचणी आल्या. यासाठी ग्राम पातळीवरील प्रशासकीय नियुक्त कर्मचाऱ्यांनी मदत करणे आवश्यक आहे.
- रामेश्वर तिडके, शेतकरी, तुळजापूर.