लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : धार्मिक स्थळामध्ये प्रवेश करून पूजा अर्चा करण्यास शासनाने मुभा दिल्यानंतर शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर मंगळवारपासून मंदिर भक्तांसाठी खुले केले जात आहे. तसेच मंदिरात प्रवेश करण्यासाठी इ-पास बंधनकारक आहे. पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भक्तांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे. दर दिवशी इ-पास असलेल्या भक्तांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठीच्या नोंदणीला सोमवारपासून सुरूवात झाली. त्यासाठी संस्थानने नोंदणी वेबसाईटची निर्मिती केली आहे. भक्तांनी दर्शनासाठी येताना इ-दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे आणि अगरबत्ती सोबत आणू नये. सोबतच थर्मल स्क्रीनिंग, हँण्डवाँश, सँनिटायजरची व्यवस्थाही संस्थानने केली आहे. मंदिरात प्रवेशासाठी भक्तांना मास्क लावणे, फिजिकल डिस्टंन्स पाळावे लागणार आहे. दुर्धर आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील व्यक्ती तसेच दहा वर्षाखालील मुलांना घरीच ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी बजावल्या नुसार खबरदारी घेतली जाणार आहे.
श्रींच्या दर्शनासाठी इ-पास; ऑनलाईन नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 12:00 PM