- ब्रह्मानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे जवळपास ९५० इलेक्ट्रॉनिक टिकिटिंग मशीन (ईटीआयएम) आहेत; परंतु सध्या या ई-टिकिटिंग मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याने जुनी पंचिंग तिकिटे प्रवाशांना फाडून दिली जात आहेत. ई-टिकिटिंग मशीनच्या बॅटरीच्या अडचणी वाढल्याने ही मशीन बेभरवशाची झाली आहे; मात्र वाहकांना या मशीनच्या तिकिटांची सवय लागल्याने आता हे जुने तिकीट वाहकांसह प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.राज्य परिवहन महामंडळ तिकीटाच्या कारणावरून नेहमीच चर्चेत असते. एसटी महामंडळाच्या होत असलेल्या आधुनिकतेकडे वाटचालीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. एसटी महामंडळाने २००८ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून खासगी कंपनीकडून ई-टिकिटिंग मशीन खरेदी केल्या. राज्यात जेवढे एसटी महामंडळाकडे वाहक आहेत, तेवढे ई-टिकिटिंग मशीन्स आहेत. जिल्ह्यात जवळपास ९५० ई-टिकिटिंग मशीन्सवर लाखोंची उलाढाल एसटी महामंडळाची सुरू आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या यंत्रात वारंवार बिघाड होत असल्याचे दिसून येत आहे. ई-टिकिटिंग मशीन्समध्येच बंद पडत आहे. बॅटरीच्या व व्हिअरच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे वाहकांना ई-टिकिटिंग मशीन वापरणे अवघड झाले आहे. ई-टिकिटिंग मशीन खराब झाल्यानंतर काही वेळ एसटी बस रस्त्याच्या कडेलाच उभी केल्या जाते. त्यामुळे काही वाहकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या पद्धतीच्या पंचिंग तिकिटांचा वापर सुरू केला आहे. मेहकर-बुलडाणा जाणाऱ्या एसटी (क्र. एमएच-१४-बी-टी-०३१९) बसमध्ये गुरुवारी जुनी पंचिंग तिकिटे प्रवाशांना फाडून दिल्याचा प्रकार दिसून आला, तर आगारातील अनेक वाहकांकडे सध्या जुन्या पद्धतीचे ‘तिकीट ट्रे’चा ई-टिकिटिंग मशीनच्या सोबत ठेवले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांना या तिकीटाचे एक वेगळेच आकर्षण वाटले.
ई-टिकिटिंग मशीन बंद पडल्यास पूर्वी वापरल्या जाणाºया पंचींग तिकीटाचा वापर करण्याच्या सूचना वाहकांना दिलेल्या आहेत. बॅटरीच्या व इतर काही तांत्रिक अडचणी ई-टिकिटिंग मशीनमध्ये निर्माण होतात. त्यामुळे जुन्या तिकीटाची ही पर्यायी व्यवस्था वाहकांकडे ठेवण्यात आली आहे.- संदीप रायलवार,विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बुलडाणा.