लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गत बारा दिवस भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेल्या विघ्नहर्ता गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गजरात ५ स प्टेंबर रोजी उत्साहात निरोप देण्यात आला. बुलडाणा शहरात मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम संगम चौकातून गणेश विसर्जनासाठी मिरवणुकीने प्रारंभ झाला. सर्वात जुन्या सुवर्ण गणेश मंडळाला मानाचा गणपती म्हणून स्थान देण्यात आले. यावेळी हतेडी येथील महिला भजनी मंडळाने सहभाग घेतला. त्यानंतर रूद्र गणेश मंडळ, जयस्तंभ चौक सार्वजनिक गणेश मंडळ, वाल्मीकी गणेश मंडळाची मिरवणूक ढोल- ताशांच्या निनादात काढण्यात आली. तर दुपारी सरकारी बगिच्या तलाव परिसरात विसर्जनासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाने निर्माल्य संकलन केंद्र उभारले होते. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्माल्य गोळा करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी अनेक भाविक भक्तांनी आपल्यासोबत आणलेले निर्माल्य संकलन केंद्राजवळ असलेल्या कार्यकर्त्यांंकडे जमा करीत होते. तर अनेकांनी परिसरातील विहिरीवर गणपती विसर्जन केले होते. त्यामुळे सर्वत्र गणेश भक्तांची गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असलेल्या खामगाव शहरातील मिरवणुकीकडे अनेकांचे लक्ष लागुन होते. मानाच्या लाकडी गणेशाचे पूजन सकाळी ९ वाजता करण्यात आले. त्यानंतर खामगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाद्धारे जनजागृती केली. मंडळांनी बेटी बचाओ, वृक्षसंवर्धन आणि जलसाक्षरतेवर भर दिला.
कडक बंदोबस्तात मिरवणूक संगम चौकातून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी व त्यांच्या पथकाने जयस्तंभ चौकासह जनता चौक परिसरात बंदोबस्तांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. तर संगम चौकात ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला. खासगी वेशात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
शिस्तबद्ध मिरवणूकबुलडाण्यात चार मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांनी ठरविलेल्या प्रमाणे शिस्तबद्ध मिरवणूक काढली. संगम चौकात प्रथम मानाचा सुवर्ण गणेश, रूद्र गणेश मंडळ, जयस्तंभ चौक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच वाल्मीकी गणेश मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. तर संध्याकाळी उशिरा शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारला होता.
डीजेला तिलांजली, ढोल- ताशांचा आवाज निनादलायावर्षी पार पडलेल्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवुणकीत सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेला तिलांजली देत ढोल- ताशांच्या निनादात श्री गणरायाला निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीत जनजागृती विसर्जन मिरवणुकीतही सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने जनजागृ ती करण्यात आली. यावेळी मुलगी वाचवा मुलगी शिकवा, वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन, व्यसनाधीनता याबाबत फलक लावून जनजागृ ती करण्यात आली.