लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत चायनिज पदार्थांची तर सध्या सर्वांनाच चटक लागली आहे. रस्त्याशेजारी फूटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात मिळत असल्याने अनेकजण त्याकडे वळतात. मात्र, हे पदार्थ बनविताना वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या यामुळे अनेकवेळा तुमच्या पोटात किती घातक पदार्थ गेले, याची जाणीव नसते. यामुळे अनेकांना पोटाचे विकार जडत असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.
काय आहे अजिनोमोटो ?
चायनिज पदार्थांना चव आणणाऱ्या अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट)च्या अतिरिक्त वापरामुळे या पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असे आढळून आले आहे. अजिनोमोटो नावाची कंपनी तयार करीत असलेल्या फ्लेव्हर एन्हान्सरचे शास्त्रीय नाव मोनोसोडियम ग्लुटामेट असून, त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. अनेक भाज्या, सॉस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रितीने मिसळू शकतो, पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र केवळ पदार्थाची चवच बिघडते असे नाही, तर खाणाऱ्याचे आरोग्यही बिघडू शकते.
...म्हणून चायनिज खाणे टाळा
मुळात चायनिज हा आपल्याकडील खाद्यपदार्थ नाही. त्यामुळे असे पदार्थ जरी आपल्याला आकर्षित करीत असले तरी, ते आरोग्यासाठी घातक आहेत. चायनिज पदार्थ खाणाऱ्यांची संख्या विदेशात असल्याने ते पदार्थ तेथील वातावरणानुसार पचनही होतात. मात्र, आपल्याकडील व्यक्तींना ते घातक ठरू शकतात. तेव्हा असे पदार्थ न खाल्लेलेच बरे, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
चायनिजचे पदार्थ आपल्याकडील नाहीत. त्यामुळे अशा पदार्थांना जिभेचे चोचले पुरविण्यासाठी जर खात असाल, तर तुम्हाला पोटाचे विकार जडू शकतात. ३० ते ४० वयोगटातील अनेकांना तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार जडू शकतात.
- डॉ. वैशाली पडघान, आयुर्वेदाचार्य व आहारतज्ज्ञ.