बुलडाणा येथे जाण्यासाठी सिंदखेड राजावरून थेट बस सेवा नाही. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रकांकडे सतत पाठपुरावा केला. परिणामतः महामंडळाने दोन दिवसापूर्वी बुलडाणा सिंदखेडराजा बस सेवा सुरू केली असली तरीही यात अनेक अडचणी कायम ठेवल्या आहेत. बसचे शेड्युल अजूनही सिंदखेड राजा बस स्थानकाकडे आलेले नाही. बस सुरू असलेल्या वेळेवर देखील शंका यावी, अशी परिस्थिती आहे. मुळात बसचा रुट देऊळगाव, चिखली असा असायला पाहिजे, परंतु सध्या ही बस दुसारबिड, साखरखर्डा मार्गे पाठवली जात आहे. या बसची वेळ सिंदखेडराजाहून सकाळी ८ वाजता निघण्याची असावी, परंतु सध्या ही बस सकाळी ६.३० वाजता सिंदखेडराजा बस स्थानकातून निघत आहे. इतक्या सकाळी बससाठी कोणते प्रवासी मिळणार असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
बस नियमित सुरू ठेवण्याची मागणी
बस सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला गेला, म्हणून ही बस सुरू केली गेली आहे.
दरम्यान, गुरुवारी या संदर्भात नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काजी यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून बस रूट व बसची वेळ आणि नियमित सुरू राहावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्याची मागणी केली. बस कायम सुरू राहिल्यास सरकारी कामासाठी बुलडाणा जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.