लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते; मात्र सध्या तेल डब्यामागे घट झाली आहे. शेंगदाणा तेल डब्याचा दर जवळपास २५० ते ३०० रुपयांनी उतरला आहे; पण पाऊचचे दर अजूनही जैसे थे आहेत. त्याचबरोबर फळभाज्या महाग होत असून, कांदा अन् वाटाण्याला चांगला भाव मिळत आहे.आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. खाद्यतेल मार्केटमध्ये ग्राहकाकडून मागणी कमी आहे. त्यातच खाद्यतेलाची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे तेल डब्याचा दर कमी झाला आहे. सोयाबीन तेल डबा २३५० ते २४४० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर शेंगदाणा तेल डबा २३०० ते २४००, सूर्यफूल डबा २४५० ते २६०० आणि पामतेल डबा १९०० ते १९५० रुपयांपर्यंत मिळू लागला आहे. आंब्याची आवक कमी झाली आहे. त्याचबरोबर डाळिंब, संत्रा, पेरुची काही प्रमाणात आवक होत आहे; मात्र इतर फळांची आवक नाही. बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १४०० ते १६०० रुपये दर मिळाला, तर दोडक्याला १० किलोला ५०० ते ५५० रुपये, गवारला ५०० ते ६०० रुपये दर १० किलोला मिळाला.
सहा महिन्यांनंतर प्रथमच खाद्यतेलाच्या दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:37 PM