वॉटर प्लांटचे मालक सापडले अडचणीत!
लाेणार : तालुक्यातील वॉटर प्लांटचे मालक अडचणीत सापडले आहेत. उन्हाळ्यात व्यावसायिक, लग्न व इतर सोहळे, यात्रा-उत्सवात त्यांच्याकडील पाण्याला मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बंद असल्याने मागणी अत्यल्प आहे.
भाजीबाजारात उसळते नागरिकांची गर्दी
डाेणगाव : काेराेना रुग्णांची संख्या घटत असल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत़ तरीही डाेणगाव परिसरात भाजीपाला व इतर दुकानांमध्ये ग्राहकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे़ फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे़
दिव्यांगांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष
धामणगाव बढे : कोरोनाचे संक्रमण टाळता यावे, म्हणून प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. पण या अभियानात दिव्यांगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांगांसाठी कोणताही विशेष दिवस नाही.
सिंदखेड राजा तालुक्यात विजेचा लपंडाव
सिंदखेड राजा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. थाेडा जरी पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित करण्यात येताे़ रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास ताे दुसऱ्या दिवशीच सुरळीत हाेताे़ त्यामुळे, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़
खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी
सुलतानपूर : खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. शहरात मंगळवारी कृषी केंद्रांमध्ये खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज
अमडापूर : परिसरातील अनेक पाणंद रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते व बियाणे नेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
सिमेंटचे दर वाढले, सर्वसामान्यांना फटका
देऊळगाव मही : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
राेहित्राचे बाॅक्स उघडेच
जानेफळ : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राेहित्राचे बाॅक्स उघडे राहत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या राेहित्रांना बाॅक्स बसविणे आवश्यक आहे.
मक्याऐवजी ज्वारी, गहू देण्याची मागणी
लाेणार : स्वस्त धान्य दुकानांत देण्यात येत असलेल्या मक्याऐवजी ज्वारी किंवा गहू देण्याची मागणी लाभार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. मक्यापासून लाभार्थ्यांना काेणताच फायदा हाेत नसल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
माेताळा तालुक्यात जाेरदार पाऊस
माेताळा : शहरासह परिसरातील १५ ते २० गावांमध्ये ७ जून राेजी जाेरदार पाऊस झाला़ शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागत पूर्ण केली आहे़ आता शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत़