लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : कोविड-१९ रोगाच्या प्रादुर्भावामुळे बालके स्थलांतरीत झाल्यास त्यांना स्थलांतराच्या ठिकाणी शिक्षण हमी पत्रकाव्दारे नियमित शाळेत दाखल करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते. मुलांचे स्थलांतरण शून्यावर आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे. शिक्षण हमी पत्रकाचा नमुना २७ नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केला जाणार आहे. सर्व शिक्षकांना शिक्षण हमी पत्रक म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय? आहे याबाबत माहिती नाही, असे होऊ नये, शिक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना शिक्षण हमी पत्रकबाबत माहिती असावी, बालक स्थलांतरीत झाल्यास शिक्षण हमी पत्रक देणे, शिक्षण हमी पत्रकाबाबत शिक्षक तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला माहितीसाठी जागृती करण्याच्या दृष्टीने शिक्षण हमी पत्रकाचा नमुना ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर २७ नोव्हेंबरपर्यंत लावण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळेने त्यांच्या गावातील कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील स्थलांतरीत बालकांची पाहणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी करुन यादी तयार करावी, स्थलांतरीत होणाऱ्या प्रत्येक बालकाचे, सर्व नोंदी भरुन विहित नमुन्यातील शिक्षण हमी पत्रक मूळ गावातील शाळेने त्यांच्या पालकांकडे द्यावे, स्थलांतरणामुळे बालक ज्या शाळेत दाखल होईल त्या ठिकाणी त्यांच्या पालकांनी मूळ शाळेने दिलेले शिक्षण हमी पत्रक संबंधित नवीन शाळेच्या मुख्याध्यापकाकडे द्यावे, मुख्याध्यापकांनी शिक्षण हमी पत्रकामधील नोंदीनुसार बालकाला वर्गात दाखल करुन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. शिक्षणाच्या सर्व योजनांचा लाभ उपलब्ध करुन द्यावा, स्थलांतरण एका पेक्षा जास्त ठिकाणी होत असल्यास ज्या ज्या गावातून स्थलांतरण होत आहे त्या त्या गावातील शाळेने सर्व माहिती भरलेले शिक्षण हमी पत्रक पालकांना द्यावे, स्थलांतरण कालावधी संपल्यानंतर पालक बालकांसह मूळ गावी आल्यानंतर शेवटचे स्थलांतरण झालेल्या कार्यक्षेत्रातील शाळेकडून प्राप्त झालेल्या शिक्षण हमी पत्रकानुसार बालकास मूळ गावातील शाळेने प्रवेश द्यावे, असे उपक्रम या अभियानातून केले जाणार आहे. त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
स्थलांतरीतांसाठी शिक्षण हमीपत्राची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:32 PM