खामगाव : तालुक्यातील हिवरा खु. येथील जि.प.उच्च मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरावी, या मागणीसाठी पालकांनी आज बुधवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली.गेल्या २७ जूनपासून सर्वत्र शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु होताच विद्यार्थ्यांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील हिवरा खु. येथील जि.प.शाळेत वर्ग १ ते ८ मध्ये १५० विद्यार्थी शिकत असून, तेथे शिक्षकांची ६ पदे मंजूर आहेत; मात्र सद्यस्थितीत येथे तीनच शिक्षक कार्यरत आहेत. एका शिक्षकाची बुलडाणा येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे, तर दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे वर्ग ८ व शिक्षक संख्या ३ अशी परिस्थिती झाली आहे. तीन शिक्षक ८ वर्गाचा कारभार कसा सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक वर्ग खामगाव सर्वशिक्षा अभियानमध्ये गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांपासून या शाळेवर पूर्ण शिक्षक कधीच राहिलेले नाही. रिक्त पदाचा प्रभार इतर शिक्षकांना साभाळून शिकवावे लागत आहे. तेव्हा त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शोभा विष्णू बघे, गोकुळा बाळकृष्ण बघे, यशोदा श्रीकृष्ण बघे, उषा गौतम इंगळे, रामेश्वर इंगळे, संजय बघे, भीमराव देशमुख, रमेश सनिसे, श्रीकृष्ण बघे, गजानन नांदे, ईश्वर बघे आदी पालकवर्ग उपस्थित होता. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. येत्या १५ दिवसाची रिक्त जागेवर शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने पं.स.मध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात येईल.- शोभा विष्णू बघे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, हिवरा खु.हिवरा खु. येथील जि.प.शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. येत्या काही दिवसात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. तत्पूर्वी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची व्यवस्था करण्यात येईल.- जी.डी.गायकवाड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स.खामगाव
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!
By admin | Published: July 06, 2017 12:19 AM