लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत शेतमालास मिळणारे अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे. यानंतरही केंद्र शासनाने कापसाला २०० रुपयांचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन सोबतच शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. मात्र, शेतमालास खर्चावर आधारित दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले आहे. अलीकडच्या काळात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. या अळीला नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये किमतीच्या फवारण्या कराव्या लागतात. यानंतरही अळीनियंत्रणाखाली येत नाही. खताच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ८०० रुपये किमतीचे खताचे पोते आता १२०० रुपयांवर गेले आहेत. मजुरीचे दर २०० रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेलच्या किमती ९२ रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे मशागतीचे दर वाढले आहेत. कीटकनाशकांच्या किमती आवाक्याबाहेर आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलही कापसाचे उत्पादन होणे अवघड झाले आहे.
एका एकराला ३० हजार खर्च; उत्पन्न १५ हजार एक एकरासाठी ३० हजारांचा खर्च येतो. मात्र, उत्पन्न १२ ते १५ हजारांचेच होत आहे. शेतकऱ्यांना १५ हजारांच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. कापसाचे उत्पादन आणि मिळणाऱ्या दरात कुठलाच ताळमेळ नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन सोडले आहे.
उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हमी दरातही त्यानुसार वाढ व्हायला हवी. उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी शेती व्यवसायाची अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळालेच नाही.- सुनील जाधव, वडगा पाटण, जळगाव जामोद