बुलडाणा : महिला व बाल विकास विभागाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सर्वच विभागांचा या खात्याशी समन्वय आवश्यक आहे. त्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्वच खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक व्यापक धोरण ठरविण्यास आपण प्राधान्य देत असल्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांंनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून काम पाहत असलेल्या ना. यशोमती ठाकूर या शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमानिमित्त बुलडाणा जिल्ह्यात आल्या होत्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, बालगृह आणि निरीक्षणगृहासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. जोपर्यंत विकेंद्रीकरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात नाही, तोपर्यंत सामाजिकस्तरावर महिला व बाल विकासाच्या प्रक्रियेत जटिल समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच टाळण्याच्या दृष्टिकोनरतून तथा महिला व बालविकास खात्याची व्याप्ती पाहता सर्वच खात्यांशी समन्वय ठेवून महिला व बालविकास कसा साधल्या जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यानुषंगाने योजना व महिला व बालविकास धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
यासोबतच मलकापूर येथील ‘त्या’ तीन मुली सध्या अमरावती येथील सुधारगृहात आहेत. त्यांचे सध्या समुपदेशन करण्यात येत आहे आणि ही बाब महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. मलकापूर येथीन तीन मुली गेल्या महिन्यात घरातून निघून गेल्या होत्या. त्यांना नंतर ताब्यात घेण्यात आले होते. सध्या अमरावती येथे त्या असून, त्यांची मानसिक अस्वस्थतेमुळे आक्रमकता वाढली आहे. त्यामुळे त्यांचे सध्या समुपदेशन करण्यात येत असल्याचे ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या.