लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना उद्रेक वाढता असतानाच, लसींचा तुटवडा जाणवत आहे. रविवारी खामगाव तालुक्यात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण प्रभावित झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत तालुक्यातील नऊ केंद्रांवर रखडले होते. मात्र, दुपारी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ५०० लसीचा पुरवठा झाला. त्यानंतर येथील लसीकरण सुरळीत झाले. राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर राज्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर, १ मार्चपासून दुर्धर आजार व ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक, ६० वर्षांवरील सर्व वृद्ध आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या लसीकरणासाठी जिल्ह्यात खासगी १६ ठिकाणी, तर ९८ शासकीय ठिकाणी लसीकरण केले जात आहे. कोरोना लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच गावागावांत कोविड-१९ लसीकरण शिबिर घेतले जात आहे.
तालुक्यात नऊ ठिकाणी लसीकरणखामगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खामगाव येथील नागरी आरोग्य केंद्रासह दोन खासगी रुग्णालये आणि उपजिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. दरम्यान, रविवारी सर्वच ठिकाणी लसींचा साठा संपला होता. त्यामुळे येथील लसीकरण प्रभावित झाले होते. सोमवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरळीत झाले.
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी दुपारी ५०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. रविवारी लसीचा साठा संपला होता. त्यामुळे रविवारी लसीकरण मोहीम बंद होती. -डॉ. नीलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव.