मोताळा : यावर्षीही पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्याची उन्हाची तीव्रता पाहता पुढील दिवसात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त म्हणून ५४ गावांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक गावांतील नागरिकांना एक ते दोन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागातील लहान प्रकल्पावरून कार्यान्वित असलेल्या नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठला असून, गावागावांतील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. काही गावांमध्ये मार्चअखेरीस पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने आठ गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. नळगंगा व पलढग प्रकल्प वगळता जवळपास पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
आठ गावांची तहान अधिग्रहणावर!
By admin | Published: April 11, 2016 1:18 AM