बुलडाणा: आर्थिक अडचणीत आल्यामुळे तीन सदस्यीय प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या अधिपत्याखाली गेल्या ८ वर्षांपासून असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची लवकरच निवडणूक होत आहे. त्याअनुषंगाने प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २१ संचालकांसाठी येत्या काळात होणाऱ्या या निवडणुकीमुळे आता सहकारातीलही राजकारण चांगलेच तापणार आहे.
या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती येथील विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १३ ऑगस्ट रोजी नियुक्ती केली आहे. त्याअनुषंगाने आता ही निवडणूक घेण्यासाठी बँकेची प्रारुप मतदार यादी अंतिम करण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्हा बँकेची आर्थिक हालत खस्ता झाल्याने बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला होता. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेवर १८ सप्टेंबर २०१३ रोजी त्रिसदस्यीय प्राधिकृत मंडळ नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान केंद्र, राज्य आणि नाबार्डकडून जिल्हा बँकेला २०६ कोटी ९९ लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर बँकेचे सीआरएआरचे प्रमाण ९ टक्क्यांवर आले होते. सोबतच आरबीआयने १३ मे २०१६ रोजी बँकेला पुन्हा परवाना दिला होता. त्यामुळे बँकेचे काम पूर्वपदावर येण्यास मदत झाली होती. त्रिसदस्यीय प्राधिकृत मंडळच आजपर्यंत जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा कारभार पाहत आहे. या प्राधिकृत मंडळाने बँकेची स्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आणली आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी सहकारी संस्था निवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आल्यानंतर बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचीही निवडणूक घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यासंदर्भानेच आता प्राथमिकस्तरावर प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी येत्या काही कालावधीत प्रत्यक्ष बँकेची निवडणूक होण्याचे संकेत यामाध्यमातून देण्यात आले आहेत.
--विपन्नतेकडून सुबत्तेकडे--
अकृषक क्षेत्रात अवाजवी स्वरुपात करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे जिल्हा बँक डबघाईस आली होती. त्यामुळे आवश्यक असणारे सीआरएआरचे प्रमाणही राखण्यास बँकेला यश आले नव्हते. बँक पूर्वपदावर आणण्यासाठी मोठी कसरत केल्यानंतर तथा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्डने ३० मार्च २०१५ ते २३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत बँकेला आर्थिक मदत केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या बँक पूर्वपदावर येण्यास मदत झाली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी प्रारुप मतदार यादीच्या निमित्ताने त्या दिशेने बँकेची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात, प्राधिकृत मंडळाने मधल्या काळात केलेल्या प्रयत्नामुळे बँकेचे सीआरएआरचे प्रमाण आता १७ टक्क्यांवर गेले असून बँकेचा एनपीए ५४ टक्क्यांवर आला आहे. तो २० च्या खाली आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
--२१ संचालकांसाठी होईल निवडणूक--
जिल्हा बँकेची येत्या कालावधीत २१ संचालकांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये ग्रामसेवा सहकारी मतदारसंघातून १३, पाच राखीव मतदारसंघ व अन्य मतदारसंघातून चार याप्रमाणे २१ संचालक निवडून दिले जाणार आहेत. त्याबाबतचा अधिकृत कार्यक्रम नंतर घोषित होईल, असे संकेत आहेत.