खामगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता इकेवायसी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ७ सप्टेंबरपर्यत मुदत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ९१ हजार लाभार्थ्यांपैकी २ लाख ७५ हजार लाभार्थ्यांनी इकेवायसी केलेले आहे. १ लाख १६ हजार लाभार्थ्यांचे इकेवायसी बाकी आहे.
पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी इकेवायसी म्हणजेच पीएम किसान पोर्टलवरील रजिस्टेशनमध्ये आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि बायोमेट्रीक अद्यावत करणे करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सीएसी सेंटर, महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करता येते. ७ सप्टेंबर पूर्वी इकेवायसी केली नाही तर पुढचा हप्ता मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. ७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करणार्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर रोजी पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता वितरित होणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे तसेच योजनेचे केवायसी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करण्यावर भर देत आहेत. अनेक शेतकºयांना त्याकरिता गावातून शहरात यावे लागत असून, अनेकदा लिंक बंद राहत असल्यामुळे तासनतास बसून राहावे लागत आहे.