चिखली : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जाहीर झाला आहे. २२ मे पासून तत्काळ प्रभावाने निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.आचार संहितेमधील तरतुदीचे योग्यरित्या पालन होण्याकरिता निवडणुका होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या सचिवांना निर्देश देण्यात आले आहे. तसा अहवाल त्यांनी सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत. तालुक्यातील येवता, कोलारा, साकेगाव, केळवद, डोंगरशेवली, महीमळ, भानखेड, वैरागड, करतवाडी, अंबाशी, करवंड व अमडापूर या १२ ग्रांपचायतीमध्ये रिक्त असलेल्या पदांच्या निवडणुकीकरिता आचार संहिता जरी संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात असली तरी निवडणूक ग्रामपंचायतीतील मतदारांवर प्रभाव पडेल अशा तºहोचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे झाल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास कळविण्यात यावे. सध्या सुरु असलेली कामे न थांबविता पूर्ण करावीत. आचारसंहिता संदर्भात कोणतीही शंका असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह पत्र पाठवून राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील दुष्काळ निवारणार्थ तसेच पूर परिस्थिती व साथीचे रोग यांच्यावर उपाययोजना करणे इत्यादी संदर्भात कोणत्याही कामकाजास आचारसंहितेची बाधा असणार नाही. मात्र, या संदर्भात होणाºया कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार व इतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांचा सहभाग राहणार नाही व आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा उद्घाटनाचा, भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे बॅनर, पोस्टर तसेच जाहिरात दर्शक फलक असल्यास काढण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. त्यांच्याकडून तशी कार्यवाही करण्यात न आल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ते काढून घेण्याची व झाकण्याची कार्यवाही करावी, अशा सुचना निवडणूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान चिखली तालुक्यातील निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायती पैकी येवता, कोलारा, साकेगाव, केळवद, डोंगरशेवली, महीमळ, भानखेड, वैरागड, करतवाडी या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज आलेले नाही अथवा अविरोध सरपंच अथवा सदस्य यांची निवड झाली असून उर्वरीत अंबाशी, करवंड व अमडापूर ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार असल्याचे निवडणूक अधिकारी तहसीलदार डॉ. अजित येळे व नायब तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
चिखली तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 2:44 PM