लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढती निश्चित झाल्या आहेत. चिन्हवाटपानंतर ५ जानेवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले हाेते. राजकीय पक्षांनी माेठ्या ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रित केले हाेते. ४ हजार ७५१ जागांसाठी तब्बल १३ हजार २७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेेते. त्यापैकी १७९ अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले. तसेच १३ हजार ९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते. पॅनलप्रमुखांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना अपक्ष व बंडखाेरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या. उमेदवारी अर्ज माेठ्या प्रमाणात दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची हाेणार आहे. ४ जानेवारी राेजी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आता निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचारास प्रारंभ हाेणार आहे. या वेळी माेठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावांवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपले लक्ष केंद्रित केल्याने रंगत वाढली आहे.
साखरखेर्डा येथे १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात
सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वांत माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २० महिला उमेदवारांचा समावेश आहे. १७ जागांवर १ ते ५ वॉर्डांत सरळसरळ लढत होत असून वॉर्ड क्रमांक ६ मध्ये एक अपक्ष निवडणूक लढवित आहे. त्यामुळे रंगत वाढली आहे.
माेठ्या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
जिल्ह्यात १७ सदस्य असलेल्या १९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींवर सत्ता कोणाची येणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांचे गाव असलेल्या हिवरा खुर्द येथेही निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच इतरही पदाधिकाऱ्यांचा कस निवडणुकीत लागणार आहे.
महिला उमेदवारांची संख्या अधिक
५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने तसेच इतर जागांवरही उमेदवारी अर्ज भरता येत असल्याने महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील तेराही तहसील कार्यालयांमध्ये महिलांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. जिल्ह्यातील २ हजार ३७६ जागांसाठी महिलांमध्ये चुरस राहणार आहे. चिन्हवाटप झाल्याने आता प्रचारास प्रारंभ हाेणार असून, रणधुमाळी सुरू हाेणार आहे.
अर्जांचा पाऊस; प्रशासनाची दमछाक
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी माेठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक हाेत आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारांनी गर्दी केल्याने रात्री उशिरापर्यंत माहिती अपडेट करावी लागली. ४ जानेवारी राेजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासह चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे, माघार घेणाऱ्या उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात तारांबळ उडाली.