लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढती निश्चित झाल्या आहेत. चिन्हवाटपानंतर ५ जानेवारीपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून राजकीय पक्षांनी माेठ्या ग्रामपंचायतींवर लक्ष केंद्रित केले आहे. ४ हजार ७५१ जागांसाठी तब्बल १३ हजार २७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेेते. त्यापैकी १७९ अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले. तसेच १३ हजार ९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले हाेते. पॅनलप्रमुखांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना अपक्ष व बंडखाेरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या. उमेदवारी अर्ज माेठ्या प्रमाणात दाखल झाल्याने ही निवडणूक चुरशीची हाेणार आहे. ४ जानेवारी राेजी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आता निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचारास प्रारंभ हाेणार आहे. या वेळी माेठ्या ग्रामपंचायती असलेल्या गावांवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपले लक्ष केंद्रित केल्याने रंगत वाढली आहे.
पाच तालुक्यात १०२९ अर्ज मागे जिल्ह्यातील पाच तालुक्यात १००३ उमेदवारांनी १०२९ अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये देउळगाव राजा, मेहकर, लाेणार, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील उमेदवारांचा समावेश आहे. या पाचही तालुक्यात आता २७६९ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतींसाठी माेठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रशासनाची दमछाक हाेत आहे.
माेठ्या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचे लागले लक्ष जिल्ह्यात १७ सदस्य असलेल्या १९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींवर सत्ता कोणाची येणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांचे गाव असलेल्या हिवरा खुर्द येथेही निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच इतरही पदाधिकाऱ्यांचा कस निवडणुकीत लागणार आहे.