खामगाव : निवडणुकीच्या काळात मद्यविक्रीचा हिशेब न देता उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकालाही माहिती न देणाऱ्या जिल्ह्यातील ८ वाईनबारचे परवाने निलंबित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सोमवारी दिला. त्यामध्ये खामगाव, शेगावातील पाच तर इतर तालुक्यातील तीन बारचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री परवानाधारकांना लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर घ्यावयाच्या दक्षतेबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार परवानाधारकांना दररोजच्या मद्यविक्रीचा तपशील त्याच दिवशी एससीएमवर भरणे तसेच दुस-यादिवशी त्याशिवाय व्यवहार सुरु न करण्याचे बजावले. त्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षकांनी सातत्याने आढावा घेतला.
अजूनपर्यंतही १ मार्च पासूनची आकडेवारी परवानाधारकांनी दिली नाही. त्यामुळे परवानाधारकांनी निवडणूकीच्या काळातही आदेशाची अवहेलना केली. दैनंदिन मद्यविक्रीची आकडेवारी एससीएम प्रणालीवर अद्यावत केल्याचे अधीक्षकांनी घेतलेल्या आढाव्यात आढळले नाही. त्यामुळे आठ वाईनबारचे परवाने आदेशापासून सात दिवसाच्या कालावधीसाठी निलंबित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिला.
परवाने निलंबित झालेले वाईनबार
१) हॉटेल विजय वाईनबार अॅन्ड रेस्टॉरंट, एफएल-३ क्र.२२, परवानाधारक वासुदेव बालुजी धानुरकर, शेगाव,
२) गौरव वाईनबार अॅन्ड रेस्टॉरंट, एफएल-३, क्र.२३, परवानाधारक माधुरी राजेश बोबडे, खामगाव
३) हॉटेल विशाल वाईन बार रेस्टॉरंट, एफएल-३ क्र.१५, परवानाधारक विशाल राजेश बोबडे, खामगाव
४) हॉटेल न्यू अजय वाईनबार अॅन्ड रेस्टॉरंट, एफएल क्र.५९, ओंकार लक्ष्मण तोडकर, जनुना, ता. खामगाव,
५) हॉटेल विश्वजित वाईनवार, एफएल-३, परवानाधारक प्रतिक श्रीकृष्ण इंगळे, अकोट रोड, शेगाव.
६) हॉटेल सुर्या अॅन्ड बार, परवानाधारक राजेश शेषराव पळसकर, डोणगाव ता. मेहकर
७) हॉटेल फ्रेन्ड्स वाईन बार अॅन्ड रेस्टॉरंट, परवानाधारक सुनंदा अशोक राऊत, माळविहीर, ता. बुलढाणा.
८) हॉटेल ग्रीनलॅन्ड हॉटेल वाईनबार, परवानाधारक शिवप्रसाद भाऊसाहेब राठोड, माळविहीर, ता. बुलढाणा,
अटींचे केले उल्लंघन
परवानाधारकांनी मुंबई विदेशी मद्य कायदा १९४९ चे कलम ५४ व ५६ चे तसेच विदेशी मद्य नियम १९५३ चे कलम ५८ व एफएल-३ अनुज्ञप्ती अट क्रमांक ८ व ९ चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.