बुलडाणा: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बोध चिन्हाची पाच हजार १७५ विद्यार्थ्यांनी बुलडाण्यातील जिजामाता प्रेक्षागारमध्ये देशातील सर्वात मोठी मानवी रांगोळी साकारत इंडियाज वल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रमातंर्गत बुलडाणा जिल्ह्याने शनिवारी सकाळी साडेआठ वाजता हा विक्रम नोंदवला. ही भव्य रांगोळी साकारताच जिजामाता प्रेक्षागारमध्ये ‘भारत माता की जय’ अशा घोषणेने आसमंत दणाणून गेला होता. तर या क्षणाचे साक्षीदार झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. शनिवारी सकाळी आठ वाजताच जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानावर सर्वत्र या उपक्रमाच्या अनुषंगाने उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वत्र हिरव्या, पांढर्या व काळ््या व केशरी रंगातील कपडे घातलेले विद्यार्थी दिसून येत होते. या एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यानंतर बुलडाणा शहरातील ११ शाळातील पाच हजार १७५ विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिस्तबद्धरित्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची बरोबर साडेआठ वाजता देशातील पहिली सर्वात मोठी मानवी रांगोळी साकारली. जवळपास पाच मिनीटे मौन पाळून तथा मान खाली झुकवून विद्यार्थ्यांनी ही मानवी रांगोळी साकारली.आता हा एक विक्रम झाला आहे. या सोहळ््यासाठी जिजामाता प्रेक्षागाराच्या प्रवेशद्वारावरील वरच्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ष्णमुखराजन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे मनोहर तत्ववादी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या समवेत आमदार चैनसुख संचेती, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद, बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेशाम चांडक, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.बी. पंडीत यांच्यासह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी एनसीसी कॅडेट्सनी जिल्हाधिकारी यांना मानवंदना दिली. सोबतच यावेळी येथे विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेतील निवडणूक व मतदार जागृती या विषयावर साकारलेल्या उत्कृष्ट चित्रांचे अवलोकनही मान्यवरांनी केले. दरम्यान, साकारलेल्या मानवी रांगोळीची दखल घेत इंडियात वर्ल्ड रेकॉर्डच्या टिमने संपूर्ण रांगोळीचे चित्रीकरणही केले. ही मानवी रांगोळी पाच मिनीटे ठेऊन या उपक्रमाची नोंद घेत असल्याबद्दलचे प्रमाणपत्र आणि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे पुस्तकही निवडणूक आयोगाला भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मतदार जागृती मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कार्यकरणार्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन अंजली परांजपे व सदानंद काणे यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी श्रीमती गोणेवार यांनी मानले.
‘बुलडाण्याची छकुली’ ठरली आकर्षण
या कार्यक्रमातच ‘चला मतदार नोंदणी करुयात’ अशा आशयाचा संदेश देणारी बुलडाण्याच्या छकुलीची प्रतिकात्मक रांगोळीही यावेळी स्थानिक शिक्षक प्रविण व्यवहारे व त्यांच्या सहकार्यांनी यांनी साकारली होती. ५० बाय ३० फुट या आकाराची ही रांगोळीही या कार्यक्रमाचे एक आकर्षण ठरली. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पनेतून ही रांगोळी साकारल्या गेली होती.