लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. येत्या १८ एप्रील रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने खामगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभाग कामाला लागला आहे. गत तीन दिवसांपासून प्रत्येक मतदान केंद्रांची तपासणी सुरू आहे.खामगाव विधानसभा मतदार संघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील गावांमध्ये गत तीन दिवसांपासून मतदान केंद्रांची पाहणी सुरू आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर उपस्थित सर्वांनाच समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी पाहणी करण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर त्या-त्या भागातील मंडळ अधिकारी व संबंधित बीएलओ प्रत्यक्ष जावून पाहणी करीत आहे. मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, वैद्यकीय कीट, प्रकाश व्यवस्था, मदत कक्ष, योग्य संकेत फलक, शौचालय, केंद्रात सावली, स्वयंसेवक, भोजन व्यवस्था, मुलांसाठी पाळणाघर, वाहतूक सुविधा, रांगेचे व्यवस्थापन तसेच मतदार सुविधांची पुर्तता करावी लागणार आहे. ही व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रांवर कशी आहे, याबाबत पडताळणी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांबाबतची माहिती ३० मार्च पुर्वी निवडणूक विभागाच्या कार्यालयाला सादर करावयाची आहे. दरम्यान शुक्रवारी पर्यवेक्षक एन. व्ही. देशमुख, बीएलओ बी.टी. घुले यांनी पाळा, गणेशपूर, वझर, झोडगा, नागझरी, शिराळा, पिंप्री कोरडे, चिंचपूर, फत्तेपूर, दधम, लाखनवाडा खुर्द, लाखनवाडा बु., आंबेटाकळी आदी गावात सुमारे २० मतदान केंद्रांवर जावून सुविधा-असुविधांबाबत पाहणी केली.
३१४ बीएलओंचा सहभाग!खामगाव विधानसभा मतदार संघात सुमारे ३१४ मतदान केंद्र आहेत. त्यानुषंगाने सर्वच केद्रांवरील पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांसह सर्वच बीएलओ कामाला लागले आहेत. मंडळ अधिकाऱ्यांसह निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी कामावर लक्ष ठेवून आहेत.