लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाइन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्यासाठी ॲप विकसित केले आहे. उमेदवारांसाठी ते डोकेदुखी ठरत असून, अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक खर्च ऑनलाइन स्वीकारावा, अशी मागणी होत आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाइलमध्ये ऑनलाइन टू वोटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल नाही. तसेच आयोगाचे हे ॲप नवीन व्हर्जनच्या मोबाइलमध्येच डाऊनलोड होत आहे.
या आहेत अडचणी टू वोटर ॲप हे एका मोबाइलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाइलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण, फक्त एकाच मोबाइलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय, मोबाइलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या ॲण्ड्रॉइड मोबाइलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे. तसेच ज्यांनी ऑफलाइन अर्ज दाखल केले, त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.