नीलेश जोशी, बुलढाणा: शुक्रवारी झालेल्या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने माफक यश मिळवत भाजप-शिवसेनेला फटका दिला आहे. आता रविवारी जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी निवडणूक होत असून त्यात ९० जागांसाठी ७ हजार ९८२ मतदार मतदान करणार आहेत. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पाच बाजार समित्यांपैकी तीन बाजार समित्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे रविवारी होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारतो यावर जिल्ह्यातील एकंदर बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
शुक्रवारच्या आलेल्या कटू अनुभवातून आता भाजप-शिवसेना कोणती व्युव्हरचना आखते हे बघण्यासारखे आहे. त्यातच भाजप-शिवसेना प्राबल्य असलेल्या पट्ट्यातील जळगाव जामोद, लोणार, चिखली, नांदुरा आणि शेगाव या ठिकाणच्या या बाजार समित्यांची निवडणूक आहेत आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनाला या पाच बाजार समित्यांमध्ये आपण कमाल करू अशी आशा असली तरी शुक्रवारच्या निवडणूकीत ज्या पद्धतीने काट्याची टक्कर देत महाविकास आघाडीने तीन बाजार समितीमध्ये मारलेली मुसंडी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुनावणीरी आहे.भाजपच्या खामगावातील बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने भाजप-शिवसेनेला फटका दिला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने शिवसेनेला दिलेली फाईट ही शिवसेनेच्या विजयापेक्षा चर्चेत राहली आहे. येथे शिवसेनेने भाजपलाही विश्वासात घेतले नसल्याची अेारड होती. त्यामुळ थोडक्यात बहुमताचा टप्पा शिवसेनेने येथे गाठला आहे. आता मेहकरच्या निवडणुकीनंतर लोणार बाजार समितीची निवडणूक होत आहे. यामध्ये काय निकाल लागतो याबाबत उत्सूकता रहाणार आहे. जिल्ह्यातील एकूण दहा बाजार समित्यांच्या निवडणूका होत्या. त्यातील पाच बाजार समित्यांच्या निवडणूका शुक्रवारी झाल्या होत्या. दरम्यान रविवारी होणाऱ्यापाचही बाजार समित्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे जळगाव जामोद बाजार समिती अविरोध करण्याचेही प्रयत्न मधल्या काळात फसले होते. त्यामुळे आता जळगाव जामोद, शेगावमध्ये माजी मंत्री तथा विद्यमान भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे, नांदुऱ्यामध्ये भाजपचे माजी आ. चैनसुख संचेती, शिवचंद्र तायडे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश एकडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. चिखलीतल विद्यमान आ. श्वेता महाले आणि काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची तर लोणारमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि आ. संजय रायमुलकर यांची प्रतिषा पणाला लागलेली आहे.